अजित पवार महाराष्ट्राचे बहुरूपी; जितेंद्र आव्हाडांनी नक्कल करत डोक्यालाच लावला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:20 PM2024-08-01T14:20:43+5:302024-08-01T14:22:10+5:30
वेशांतर करून दिल्लीला अमित शाहांना भेटायला जायचो असं अजित पवारांनी खुलासा केल्यानंतर त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
मुंबई - महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा खेळ चालायचा, तो वेगवेगळी रुपे घेऊन यायचा, महाराष्ट्राला एवढा मोठा बहुरूपी कलाकार मिळाला. त्यांचे कानटोप्या घातलेले, गॉगल लावलेले फोटो काढूनही ठेवले होते. माणसाच्या चारित्र्यात हे सगळं रचलेले असते. ते किती रूप बदलू शकतात, करायचे तर निधड्या छातीने करायचे..मी कोणाला घाबरत नाही, जे करतो समोर करतो, केले म्हणजे केले अशी नक्कल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यात ते म्हणाले की, जे काही केले टोपी घालून, गॉगल घालून, रेनकोट घालून..महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्यापेक्षा महाराष्ट्राला भूषवणारा चांगला उपमुख्यमंत्री मिळायला हवा. माणूस म्हणून जगायचं असेल ताठमानेने जगा, सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून आपला वेश बदलायचा म्हणजे तुम्ही स्वत:ला बदलताय. यापुढे बहुरूपी म्हणून चित्रपटात चांगली ऑफर येऊ शकते. नशीब दाढी वाढलेले फोटो पाठवले नाहीत असा टोला आव्हाडांनी लगावला.
त्याचसोबत ही बातमी एका खासदाराच्या घरी जेवताना तिथल्या पत्रकारांना सांगितली. बातमी हायलाईट कशी झाली नाही यासाठी फोनही केले. माझी बातमी लावा याची किती हौस, महाराष्ट्राच्या विकासाची बातमी लावायची होती. मी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही. त्याची भरपाई महाराष्ट्राला मदत करेन. मी महाराष्ट्राची क्षमा मागतो. मी भाजपा नेतृत्वाला भेटायला रात्री १ ला जायचो, ५ वाजता परत यायचो. ते मी केले परंतु जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला गेलो नाही हे सांगायचे होते. वेशभूषा करून गेलो, याच्या तुम्ही बातम्या का लावत नाहीत असं विचारायचं, यावर काय बोलायचं असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी डोक्यावरच हात मारून घेतला.
दरम्यान, लोकशाहीत आपल्या आधार कार्डावरचं नाव बोर्डिंग पासवर नसणे, तिकिटावर नाव नसणे याची सगळी चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या आधारकार्डावर अजित अनंतराव पवार असं असेल तेच नाव बोर्डिंग पासवर हवं. दुसरं नाव छापलेच कसे, ज्या एअरलाईन्सनं दिलं त्यांनाही गुन्ह्यात घ्या. उद्या कुणीही अतिरेकी नाव बदलून जाईल. तुमच्या नावाला जे शासकीय नोंदवहीत आहे त्याला काही किंमतच नाही. राष्ट्रीय सुरक्षेची मस्करी लावली का? हे गांभीर्याने घेतले पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी कायद्याचे तुकडे तुकडे केले. उपमुख्यमंत्री होण्यासाठी काकाला ढकलून द्यायचं होतं. ए अनंतराव पी हे खोटं नाव ऐकून मला हसू आलं असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.