मुंबई - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरून शिवस्वराज्य यात्रेचे प्रारंभ करण्यात आहे. यावेळी, अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना अभिमानाने नव्हे तर लाजेने आणि शरमेने बोलावे लागत होते, असे कोल्हे म्हणाले.
राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन अमोल कोल्हे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या यात्रेला सुरवात केली. यावेळी आपल्या भाषणातून कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना मी अभिमानाने किंवा आनंदाने बोलत नव्हतो, तर लाजेने आणि शरमेने बोलत होतो. अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
ज्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा भाजीच्या देठाला हात लावू नका असे सांगितले होते. त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे, हे दारूण वास्तव लोकसभेत सांगाव लागत होते. आणि हे सांगत असताना विचाराव वाटते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.