- अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सत्तेत सलग १५ वर्षे राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या १८ व्या वर्धापन दिनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, कर्जमाफी करा, असे सांगून आंदोलन करावे लागते यासारखे दुर्दैव दुसरे नाही. सर्वात मोठी कर्जमाफी कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी केली होती, याची आठवण राष्ट्रवादीचे नेते वारंवार करून देतात. मात्र कर्जमाफी वारंवार देता येणार नाही, त्यामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्यांवर अन्याय होईल, असेही पवारच बोलले होते, हे मात्र ते सांगत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही आंदोलन करत आहोत, असे सांगणारे नेते रस्त्यावर उतरताना पक्षाचे झेंडे घेऊन जायचे नाही, अशा सूचनाही हेच देतात, तेव्हा राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी विकासाची गोष्ट करतात, शेतीसाठी पायाभूत गोष्टी करण्याची गरज मांडतात, तर राष्ट्रवादीचे नेते सरसकट कर्जमाफी मागतात. मात्र शेतकऱ्यांची ही अवस्था का व कोणामुळे झाली आणि यावर कायमस्वरूपी उपाय आपण काढणार आहोत की नाही यावर राष्ट्रवादीचा एकही नेता गंभीरपणे मांडणी करताना दिसत नाही.जे नेते गंभीर मांडणी करण्याचा प्रयत्न करतात, ते दुसऱ्या फळीतील आहेत आणि त्यांचे नेतृत्व वाढू देण्याविषयी पक्षातच संभ्रम आहेत. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ अडचणीत आहेत. जयंत पाटील राजकीय व सोयीचे बोलून वेळ मारून नेतात, तर दिलीप वळसे पाटील अभ्यासू असूनही बोलत नाहीत. परिणामी पक्ष एकसंघपणे ना निवडणुकांना सामोरे जाताना दिसतो, ना कधी भूमिका घेताना समोर येतो. सर्व निवडणुकांमध्ये पक्षाची पिछेहाट होत असताना एकट्या धनंजय मुंडे यांना त्या कशा जिंकता येतात? बारामतीमध्येही निवडणूक प्रचाराला मुंडे यांनी यावे असा आग्रह का धरला जातो, याचा पक्षात कोणी विचार करताना दिसत नाही. या प्रश्नांची उत्तरे साधी सोपी, पण वरिष्ठ नेत्यांना पचनी पडणारी नाहीत. पहिल्या फळीतले नेते व त्यांच्या भूमिकांवर पक्षात आणि जनतेत विश्वास नाही. धनंजय मुंडे यांच्यासारख्या कोरी पाटी असणाऱ्यांबद्दल पक्षात आणि त्या विचारांच्या लोकांना विश्वास वाटत असेल तर असे दुसऱ्या फळीतले नेते पक्षाला जाणीवपूर्वक समोर आणावे लागतील. पवारांच्या भाषेत भाकरी फिरवण्याची वेळ आलेली असताना ती फिरवली जात नाही, याचा अर्थच त्यांना दुसऱ्या फळीतले नेते पुढे यावे असे वाटत नाही किंवा त्यासाठी कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही.एखादा पक्ष १८ वर्षांचा होतो आणि त्यांच्याकडे पहिल्या फळीतले विश्वास वाटण्यासारखे नेतेच नसावेत, यासारखी शोकांतिका नाही. आपण उभी केलेली व्यवस्था आपल्या अपरोक्ष नीट चालत असेल तरच तो जाणता नेता म्हणून ओळखला जातो. येथे व्यवस्था नीट चालणे तर दूरच, उलट ती कधी उभीच राहिलेली दिसत नाही. राष्ट्रवादीत कोण ठामपणे भाजपाच्या विरोधात उभा राहतो यापेक्षाही कोण आधी भाजपात जातो याची स्पर्धा लागल्याच्या चर्चा खासगीत रंगत असतील, तर हा पक्ष कोणत्या चेहऱ्याने ‘बळीराजाची सनद’ तयार करून जनतेसमोर जाऊ शकेल?शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले तेव्हा पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलनात जाऊ नका, पण आंदोलनाला रसद पुरवा, असे छुपे आदेश जेव्हा पक्षातून दिले गेले, तेव्हा पक्षाच्या वकुबाबद्दल शंका निर्माण झाल्या. राज्यातल्या काँग्रेसची अवस्थाही नेतृत्वहीन झाली आहे. राष्ट्रवादीत ज्या नेत्यांचे ऐकले जाते ते बोलत नाहीत आणि ज्यांच्यावर विश्वास उरला नाही ते जागा रिकामी करायला तयार नाहीत. परिणामी पक्षाच्या १८ व्या वर्षीही शरद पवार यांच्या नावावरच पक्षाची सुरुवात होते आणि त्याच नावावर येऊन थांबते. पण शरद पवार यांच्या जवळपास येणारे नेतृत्वही का उभे राहू शकत नाही याचा विचार करायचा तरी कोणी?आर.आर. पाटील यांची उणीव सतत या पक्षाला जाणवत राहते. मात्र ते हयात असताना आर.आर. म्हणजे राष्ट्रवादीची ‘फेसव्हॅल्यू’ होती हे कळत असूनही त्यांना कधी मोकळेपणा पक्षाने दिला नाही. याचे अनेक किस्से मांडता येतील. पण आता त्यालाही काही अर्थ नाही. खा. सुप्रिया सुळे कधी देशपातळीवर काम करणार म्हणून सांगितले जाते. पण राज्यपातळीवर त्या अशी विधाने करून जातात की पक्षाला मदतीपेक्षा अडचणच व्हावी. शरद पवारही आंदोलन चालू ठेवा, पण दूध, भाजीपाला रस्त्यावर न टाकता गोरगरिबांना द्या, असे आवाहन करतात तेव्हा या पक्षाला नेमके करायचे आहे तरी काय याविषयी संभ्रम पक्षात व कार्यकर्त्यांमध्येही होतो.आपण सत्तेत असून १५ वर्षे काही देऊ शकलो नाही आणि अडीच वर्षे सत्तेवर आलेल्या पक्षाने सगळे काही द्यावे, अशी अपेक्षा आपण कशाच्या जोरावर करता, असे सवाल केले की माध्यमे पक्षपाती झाली असे बोलून हेच नेते मोकळे होतात. बळीराजाची सनद करताना त्यात ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या मागण्या सत्तेत असताना अमलात आणणे राष्ट्रवादीला शक्य नव्हते, असा त्याचा अर्थ निघतो. शेतकरी आंदोलनामध्ये अग्रभागी भूमिका घेऊन राष्ट्रवादीला हे आंदोलन तीव्र करावे असे वाटत नाही, कारण तसे केले आणि आपल्या काही भानगडी मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढल्या तर, असा प्रश्न या नेत्यांना अस्वस्थ करत राहतो. त्यातून मग दुसरे कोणी आंदोलन करत असतील, तर त्यांना पाठिंबा देण्याची बोटचेपी भूमिका घेण्याची अगतिकता पक्षावर येते. त्यातून पक्षावरचा विश्वास कसा वाढणार? पक्षाने शनिवारी राज्यभर १८ वा वर्धापन दिन साजरा केला. पण या सगळ्या विचारमंथनाला बाजूला ठेवूनच...दुसरी फळी तशी रिकामीच- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे वगळले तर राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेतृत्व उभारणीसाठीचे फारसे प्रयत्न केलेले पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत तरी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी फळी तशी रिकामीच आहे. - मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे त्या भागातील नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. परंतु मराठवाड्याबाहेर त्यांना महत्त्व देण्यात आलेले नाही.