मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचं जाहीर करताच राष्ट्रवादीनं अण्णा हजारेंना टोला लगावला आहे. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं अण्णांवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल पंप 'गुडमॉर्निंग अण्णा' बोलतोय तर गॅस सिलेंडर 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न विचारतंय अशा व्यंगात्मकरित्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारे यांना जोरदार चिमटा काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, देशात गॅस सिलेंडर, पेंट्रोल-डिझेल दरवाढ झाली पण अण्णा हजारे आंदोलनाला पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर व्यंगचित्र काढलं. यात पेट्रोल पंप 'गुडमॉर्निंग अण्णा' बोलतोय तर गॅस सिलेंडर 'आमच्यासाठी आंदोलन कधी? असं शेजारी बसलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचं दाखवलं. अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. मात्र राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले.
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे मात्र राष्ट्रवादीनं व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार फटकारे लगावले आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे तर चक्क गॅस सिलेंडरच 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न करत आहे.
काय म्हणाले होते अण्णा हजारे?
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले, तसेच सरकारला इशाराही दिला. मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारेंनी दिला. नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे साकडे घातले होते.
अण्णा होते कुठे इतके दिवस?; - राज ठाकरे
मंदिर उघडण्यात येत नसल्याच्या सरकारच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने लवकरच मंदिरं न उघडल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटनाद आंदोलन करणार असल्याचं राज यांनी सांगितलं. तसेच, अण्णा हजारेंनी इशारा दिलाय, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अण्णांना चिमटाही काढला. अण्णा होते कुठे इतके दिवस?, असे म्हणत राज यांनी अण्णांच्या आंदोलन इशाऱ्यावर चिमटा काढला.