Ajit Pawar Anjali Damania | अजित पवारांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानियांचे 'भाजपपुरस्कृत' ट्वीट; राष्ट्रवादीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:56 PM2023-04-12T14:56:23+5:302023-04-12T14:56:56+5:30
अजित पवार भाजपासोबत जाणार, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केल्याने खळबळ उडाली
Ajit Pawar Anjali Damania | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉट रिचेबल, भाजपासोबत जाणार अशा चर्चा होत होत्या. त्यानंतर अजित पवारांनी समोर येत स्पष्टीकरण दिले होते. आता पुन्हा अंजली दमानिया यांनी '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार' असे ट्विट केल्याने चर्चा सुरु झाली होती. यावर अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिले. पण राष्ट्रवादीने मात्र आता अंजली दमानिया यांच्यावरच भाजपाच्या सांगण्यावरून असे ट्वीट केल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचा आरोप
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी भाजपपुरस्कृत ट्वीट केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार अंजली दमानिया यांना कुणी दिला, असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. विद्यमान सरकारच्या अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टातून यायचा आहे. निकालानंतर नवीन चित्र निर्माण होईल असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे. याचा अर्थ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या असे करत आहेत, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. आणि राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे काम करत आहेत म्हणून बदनाम करण्यासाठी अंजली दमानिया यांनी हे ट्वीट केल्याचे महेश तपासे यांनी आरोप केला.
अंजली दमानिया यांचे स्पष्टीकरण
मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानियांनी सांगितले.
दमानिया यांचे भाजपवरही टीकास्त्र
आपण सारेच बघतोय आज महाराष्ट्रातील बँकेचा घोटाळा बाहेर काढला जातोय. जरंडेश्वरवर कारवाई होतेय. आजचीच बातमी पाहिली तर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे नाव जरंडेश्वर चौकशीतून वगळण्यात आले. दोन कंपन्या गुरु कमोडिटीज व स्पार्कलिंग सॉईल आहेत. यापैकी स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. असे असूनदेखील त्यांची चौकशी न होणे आणि नाव वगळणे हे सगळे एक प्रकारचा दबाव बनवायचे आणि विरोधी पक्षातील जे कोणी असतील त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे ही भाजपाची स्ट्रॅटेजी राहिली आहे, असा आरोप दमानिया यांनी केला.