मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदार संघातील ब्राम्हण समाजाने विरोध दर्शविला आहे. या विरोधानंतर चंद्रकांत पाटील यांनी मी कुणी परका नसून पुण्याचाच असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्टूनद्वारे ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. यामध्ये कोथरुडमधील स्थानिक नागरिक चले जाव असं म्हणत आहे. मात्र चंद्रकांत पाटील मी कुणी परका नसून पुण्याचाच असल्याचे सांगत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मी १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे पुणे पदवीधरचा आमदार होतो. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकरांना मी काय परका नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.
कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. तसेच ब्राह्मणच उमेदवार हवा, अस सांगत मेधा कुलकर्णी यांना पाठिंबा दर्शविला होता. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी नाराज असल्याचीही चर्चा आहे. परंतु, घराघरात जाऊन, सोसायट्यांमध्ये फिरून, सर्व जाती-धर्माच्या लोकांना भेटून आपण चंद्रकांत पाटील यांचाच प्रचार करू, अशी भूमिका मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केली आहे.