मुंबई: काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना 'तुम्ही घरी जा स्वयंपाक करा', हे वक्तव्य केले होते. यानंतर महिला आयोगाने चंद्रकांत पाटलांना पत्र पाठवून या वक्तव्याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. या वक्तव्यावर पाटलांनी दिलगीरीही व्यक्त केली. पण, आता परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने काल लागलेल्या UPSCच्या निकालावरुन पाटलांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीचा खोचक सवालकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात पहिले चार क्रमांक मुंलीनी पटकावले आहेत. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसनेचंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे. "केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालामध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिले चार क्रमांक पटकावत मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. चंद्रकांतदादा, आता त्यांनाही ‘घरी जा, स्वयंपाक करा’ असा सल्ला द्याल का?", असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला आहे.
चंद्रकांत पाटलांकडून अभिनंदनदरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीदेखील ट्विट करत UPSC परीक्षेत पास झालेल्या मुलींचे कौतुक केले आहे. "UPSC परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या चारही क्रमांकांच्या मानकरी महिलाच आहेत. अष्टावधानी स्त्री कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाही, हेच यातून पुन्हा अधोरेखित होतंय. लखलखतं यश मिळवलेल्या स्त्री शक्तीला सलाम. यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन!", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?सुप्रिया सुळेंवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती. "कशासाठी राजकारणात राहता? घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही, एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," अशी टीका पाटलांनी केली होती.