Maharashtra Politics: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमधील गुंतवणूक वाढीसंदर्भात योगी आदित्यनाथ यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ अनेक उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. आपल्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा, बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान घेण्यात येणाऱ्या आदित्यनाथांच्या रोड शो वरून खासदार संजय राऊतांनी टीका केली होती. त्यातच आता राष्ट्रवादीनेही या दौऱ्याबाबत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
"हा भाजपाचा कुटील डाव"
"मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण केले पाहिजे. भाजपाच्या कुटील डावाला भूमिपुत्रांनी बळी पडू नये. महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे. भाजपा एक विचित्र डाव खेळत आहे. या डावाला मुंबईकर आणि राज्यातील जनतेने बळी पडता कामा नये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तर प्रदेशमध्ये नेण्याचे विधान केले आहे. गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योग व बॉलिवूड पळविण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ज्या बैठका त्यांनी घेतल्या, त्यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे व्हिजन सांगितले. परंतु हा भाजपाचा कुटील डाव आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी ही भाजपची रणनीती आहे," असा घणाघाती आरोप तपासे यांनी केला.
"गुजरातची निवडणूक होती त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले आणि गुजरातमध्ये सरकार आणले. आता ही लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातून उद्योग उत्तरप्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भाजप रचत आहे. या डावाला हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावे," असे आवाहनही महेश तपासे यांनी केले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
"राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताज हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलात, तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्मानाने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचे योगदान घ्यायला आला आहात, तर रोड शो कशासाठी?" अशी विचारणा संजय राऊतांनी केली.