राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला जबर दणका, मालेगाव महानगरपालिकेत महापौरांसह सर्व नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:08 IST2022-01-25T21:07:48+5:302022-01-25T21:08:35+5:30
Malegaon Municipal Corporation : राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून एकमेकांमध्ये पक्षांतराची मालिका सुरूच आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला जबर दणका, मालेगाव महानगरपालिकेत महापौरांसह सर्व नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ
मालेगाव - राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून एकमेकांमध्ये पक्षांतराची मालिका सुरूच आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या मालेगाव महापालिकेतील महापौरांसह सर्व २७ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
मालेगावमधील काँग्रेसचे स्थानिक नेते माजी आमदार रशिद शेख हे पक्षावर नाराज होते. त्यानंतर रशिद शेख यांच्या पत्नी मालेगावच्या महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रशिद शेख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली.
यावेळी रशिद शेख यांना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र बाळासाहेब थोरात वगळता कुठल्याही मंत्र्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही नाराज होते. ऊर्जा मंत्रालय कांग्रेसकडे होते. मात्र मालेगावसाठी काहीही निर्णय झाला नाही. या सर्व कारणांमुळे आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.