NCP SP Sharad Pawar News: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित मुखपत्राने दुसऱ्यांदा अजित पवार यांच्याविरोधात भाष्य केले आहे. याचाच अर्थ भाजपाला आता अजित पवार किंवा त्यांचा पक्ष नकोसा झालेला आहे. भाजपा फक्त दुसऱ्यांचे पक्ष, कुटुंब फोडते. त्यातून काही प्रमाणात मतांचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने या राजकारणाला फाटा दिला. खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणता, हे लोकांनी दाखवून दिले आहे, या शब्दांत शरद पवार गटाच्या नेत्याने भाजपावर निशाणा साधला.
ऑर्गनायझरनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS शी संबंधित आणखी एका साप्ताहिकाने लोकसभा निवडणुकीवर स्पष्ट शब्दांत भाष्य करत अजित पवारांना महायुतीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही, असे या लेखात म्हटले आहे. यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाष्य करत भाजपावर हल्लाबोल केला.
अजित पवार गटातील लोकांनाही या गटाबाबत साशंकता वाटत आहे
अजित पवारांना बरोबर घेऊन फायदा तर काहीच नाही, उलट नुकसानच अधिक झाले, याची प्रचिती लोकसभा निकालानंतर भाजपाला आली असावी. त्यामुळे भविष्यात त्यांना अशा लोकांना सोबत घ्यायचे नसेल. आता तर उलट अजित पवार गटातील लोकांनाही आता या गटाबाबत साशंकता वाटत आहे. अजित पवारांच्या बारामतीमध्येच त्यांच्या उमेदवारांना लीड मिळू शकलेला नाही. याचाही विचार भाजपाने केला असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, ऑर्गनायझर नंतर आता आणखी एका साप्ताहिकाने अजित पवारांच्या विरोधात लेख लिहिला आहे. त्यामुळे भाजपा आणि अजित पवार यांच्यात नेमके काय चालले आहे? याबाबत काही ठामपणे सांगू शकत नाही. याबद्दल ते दोन पक्ष बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.