NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते लोकसभेची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यातच आता मला भाषण करण्याची इच्छा नाही. ही योग्य पद्धत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार गटाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. यातील एका सभेत संबोधित करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेत्यांचे भाषण सुरू असताना अचानक समोरच्या लोकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून गोंधळाला सुरुवात झाल्याचे समजते. यावरून जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.
मला आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही
कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? काय चालले आहे? असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही. मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. आता उशीर झाला आहे. माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. आपण आता सभा थांबवणे योग्य ठरेल. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा, या शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
दरम्यान, तुमचे पेशन्स संपलेले आहेत. तुमच्यात काही शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणे होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येने इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालता? असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.