NCP SP Group Jayant Patil News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा, दौरे सुरू आहेत. जागावाटपाबाबत चर्चांना वाढल्या आहेत. यातच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरून आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर आवाहन करूनही शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मौनच बाळगले. निकालानंतर यावर चर्चा करण्याचा पवित्रा या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. यातच जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा आहे? हे सांगणे सर्वांत कठीण आहे. आता शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आता ठरणार नाही. त्यावर नाना पटोलेंनी री ओढली. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यासंदर्भात शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? तुम्ही की सुप्रिया सुळे? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.
शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? तुम्ही की सुप्रिया सुळे?
शरद पवार हे खूप अनुभवी नेते आहेत. आम्ही याबाबत त्यांनी विचारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच असे कोणीही ठरवून मुख्यमंत्री होत नाही. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सर्वजण बसून ठरवतील. शरद पवारांचे नेतृत्व आम्ही मान्य केले आहे. शरद पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. महाविकास आघाडीला यावेळी सत्तेत आणण्याचे आमचे ध्येय आहे. कारण महाराष्ट्राची ती गरज आहे, अशी आमची भावना आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, जनता प्रचंड त्रस्त आहे पण महायुती सरकार मात्र घोटाळे करून पैसे वसुल करण्यात व्यस्त आहे. राज्यातील वातावरण मविआसाठी अनुकुल आहे, परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता बनलेली असून भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने मविआचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला.