NCP SP Group MP Amol Kolhe News: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरयाणा येथील निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याबाबत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विविध माध्यमांनी अशाच बातम्या दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोग तातडीची पत्र परिषद घेणार असे वृत्त येताच महाराष्ट्राची निवडणूकही जाहीर होणार अशा बातम्या पसरल्या. प्रत्यक्षात तसे झाले नाही. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला.
...म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली
ऑक्टोबरमध्ये व्हायची, ती नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण यांना कळले आहे की, महाराष्ट्रातील जनतेसमोर नापास होणार आहोत. म्हणून महायुती सरकारने त्यांच्या दिल्लीतील पिताश्रींना सांगितले की, तेवढे निवडणूक आयोगाला सांगा, कुठलातरी क्लॉज वापरा. १५ वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर होत नाही. निवडणूक आयोगाने पाऊस, पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारणे दिली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे, सरकारचे धाकधूक धाकधूक आणि पाकपूक व्हायला लागले आहे. म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली, अशी टोलेबाजी अमोल कोल्हे यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत बोलताना स्पष्ट केले की, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता. मात्र, आता आम्हाला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे. त्यातील जम्मू-काश्मीर, हरयाणाची निवडणूक आम्ही जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या दोन राज्यांची निवडणूक यावर्षी घ्यायची आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभेची निवडणूक व्हावयाची आहे. महाराष्ट्रात मोठा पाऊस पडत आहे आणि सणासुदीचेही दिवस आहेत असे म्हणत राजीव कुमार यांनी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेतच एकप्रकारे दिले.