Beed Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही एक आरोपी फरार आहे. तसेच सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. विविध मागण्यासाठी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबतचा आदेश जारी केला. संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने लोटले असून, तपासात कोणतीही प्रगती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. अखेर ती मान्य करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकिलांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या?
सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचे मी स्वागत करते. पण सातवा आरोपी जो खुनी आहे तो गायब आहे. एक माणूस राज्यात गेले ७२ दिवस आपल्याला सापडत नाही, याच्यावर माझा विश्वास नाही. अनेक वेळा मुख्यमंत्री, एस पी पोलीस यंत्रणेला संपर्क केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची दोनदा भेट घेतली, आम्हालाही सहकार्य करायची पूर्ण तयारी आहे. आम्हाला याच्यात कोणतेही राजकारण आणायचे नाही . बीडमधील दोन कुटुंब आणि परभणीतील एक कुटुंब या तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की, मी या खटल्याचे कामकाज बघावे. पण, त्यांना मी काही कारणास्तव नकार दिला होता. त्याची कारणेदेखील त्यांना विशद करून सांगितली होती. पुन्हा ग्रामस्थांनी जे अन्नत्याग आंदोलन केले आहे, ते बघून व्यथित झालो. कारण माझ्या नियुक्तीसाठी आणि इतर काही मागण्यांसाठी त्यांनी अन्नत्यागाच्या उपोषणाला बसावे, ही निश्चित चांगली गोष्ट नाही. त्यांचा विश्वास सरकारवर आहे. माझ्यावर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की, मी खटला चालवण्यास तयार असल्याची समंती दिली. ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की, कायदा या देशात मोठा आहे. कायदा मोठा असल्यामुळे न्याय प्रत्येकाला मिळतोच. म्हणून माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा. या खटल्याचे जेव्हा आरोपपत्र दाखल होईल, तेव्हा हा खटला जलदगतीने चालवला जाईल, एवढेच मी आश्वासित करू इच्छितो, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.