NCP SP Group Supriya Sule News: नववर्षाच्या सुरुवातीला राज्यासह देशातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी आराध्य देवतेच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशी दोन्ही हात जोडत प्रार्थना केली. तसेच सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, असे साकडे विठ्ठलाचरणी घातले, असे आशाताई पवार यांनी सांगितले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा वाढत गेल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे निवडून आल्या. विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माझ्या मनात कधीच खदखद नव्हती. लोकसभेच्या मतदानानंतरही पहिल्यांदा आशाकाकींच्या पाया पडायला गेले. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, संपूर्ण देशात पवार कुटुंबाचे वलय खूप मोठे आहे. त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, शरद पवारांनी गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी, समाजासाठी इतकी वर्ष काम करत आहेत. अजित पवार किती कामाचे आहेत, ते फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश मान्य करतो. शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले होते.