NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Parbhani Agitation: संविधान अवमाननाप्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांना आश्रुधुराचे नळकांडे फोडून बळाचा वापर करावा लागला. शिवाय अग्निशामकच्या वाहनातून आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पंगविण्यात आले. ठिकठिकाणी रस्त्यावर पेटविलेल्या टायरची आगही अग्निशमन दलाने विझविली. जिंतूर मार्ग, पाथरी मार्ग वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. तसेच टायरही जाळून वाहतूक रोखण्यात आली होती. अचानक आंदोलन चिघळले. आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. याप्रकरणी आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीकचा जमाव मात्र तसाच होता. स्टेशन रोडवर दगडफेक सुरू होती. त्यानंतर हा जमाव पोलिसांच्या वाहनांवर चालून गेला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. पोलिसांवर लाठ्यांनी हल्लाही झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाढीव कुमक मागवून शहरातील विविध भागात आंदोलकांना पिटाळून लावले. यात काही ठिकाणी आश्रुधुराचाही वापर झाला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसमत रोड भागातही पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि एकाला अटक केली. कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती सर्वांना करतो. जर येत्या २४ तासांत सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.