NCP SP Jayant Patil News: कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे.
जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. माझ्या अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात राज्यात मालमत्ता निर्मिती होत नसल्याबद्दल राज्याचे लक्ष वेधले होते. नेमकी तीच बाब देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’ च्या अहवालात मांडली गेली आहे. या भाषणात असेही नमूद केले होते की, राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून, हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे. अगदी तेच निरीक्षण महालेखापरीक्षकांनी नोंदवले असून ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले.
सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे
आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे, असे गेले काही दिवस सांगत आहोत. त्यावर सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. राज्य सरकार वाटत असलेली अनावश्यक अनुदाने कमी करावीत, मालमत्ता निर्मितीकडे लक्ष पुरवावे, वाढीव पुरवणी मागण्या सादर करताना करताना त्याचे समर्थन करता यावे, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खर्च करण्याची पद्धत थांबवावी, अशा कडक शब्दांत कॅगने शिंदे -फडणवीस-पवार सरकारला सुनावले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुढील पिढी भिकेला लागली तरी चालेल पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुकुन टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन आहे, अशी टीका करण्यात आली आहे.