NCP SP MP Amol Kolhe On Maratha Reservation: आताच्या घडीला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आणि मराठा समाज आपापल्या भूमिकांवर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ठाम आहेत. तर काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, असा आग्रह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे.
मीडियाशी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, समाज सगळ्याच घटकांपासून बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. सगळ्या समाज घटकांच्या आकांक्षांचा विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. संसदेत नियोजन घेण्याची मागणी केली असून ती सर्वांची मागणी आहे, जातीय जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना झाली तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी फायदा होईल, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
...तर स्वागत करू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. मी ही ऐकले आहे. माझी अजून भेट झाली नाही. अडचणीच्या काळात ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली. त्या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा सगळा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील. अडचणीच्या वेळी जे लोक सोबत होते त्यांचे मत आणि मेहनत दुर्लक्षित करून चालणार नाही. येणारे का येत आहेत आणि त्यांची का गरज आहे, याचा विचार करून स्वागत करू, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.