पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील एका सभेत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तो कोणाबद्दल होता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. अजित पवार यांनी मांडलेले विचार पक्षाच्या धोरणांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर त्यांच्या पक्षाचा नेता कोण, चिन्ह कोणते असे सगळे नमूद केले आहे. भाजपला मदत करण्यासाठी लोकांनी त्यांना मते दिलेली नाहीत, असेही पवार म्हणाले. पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुमन पाटील, अशोक पवार, पंडित क्षीरसागर आदी उपस्थित होते. अजित पवार यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
...त्यांना मी मंत्रिपद मागेन का? माजी मंत्री अनिल देशमुख यांना मंत्री करण्यास भाजपने नकार दिला, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला खुद्द अनिल देशमुख यांनीच उत्तर दिले. ज्या पक्षाने माझी खोटी चौकशी लावून मला त्रास दिला, त्यांच्याकडे मी मंत्रिपद मागेन का? असा प्रश्न त्यांनी केला.
राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे मतदारांना माहिती आहे. निवडणूक लढवताना, मते मागतानाची त्यांची भूमिका व त्यांनी आता घेतलेली भूमिका विसंगत आहे हे मात्र मला माहिती आहे. आमच्या चर्चा झाल्या; पण त्या पक्षाच्या विचारांशी, ध्येयधोरणांशी सुसंगत अशा विचारांवर झाल्या. त्यांना ज्या रस्त्यावर जायचे होते तिकडे मला आणि माझ्याबरोबर जे आहेत त्यांना जायचे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा आहे हे मतदारांना चांगले माहिती आहे. अजित पवार यांची भूमिका पक्षाच्या विचारांशी विसंगत होती. लोकशाहीत त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे, मात्र निवडून येताना लोकांना जे सांगितले त्याचे काय करणार? असा सवालही शरद पवार यांनी केला.
पक्ष सोडून का चालले हेही लिहा...खासदार प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहून त्यात अनेक गौप्यस्फोट करणार असतील तर मी त्या पुस्तकाची वाट पाहतो. त्यात त्यांनी एक चॅप्टर इडीने त्यांच्या घराच्या किती मजल्यांची कशी चौकशी केली त्याविषयी असूद्या, तसेच लोक हल्ली पक्ष सोडून का चालले आहेत हेही त्यामध्ये लिहा...अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल लिहिणार असल्याचा पुस्तकाची खिल्ली उडवली.
लोकच काय तो निर्णय घेतील बारामतीत किंवा कुठेही कोणालाही आपली मते, आपले विचार लोकांसमोर घेऊन जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर लोकच काय तो निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.