मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २३ दिवस झाली आहेत. मात्र अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकला नाही. त्यात राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणजे पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे आपल्या पराभूत सैन्याचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याचा खोचक टोला मलीक यांनी फडणवीस यांना लगावला.
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिकिया वेळी बोलताना मलीक म्हणाले की, भाजपकडे १०५ चे संख्याबळ असून ११९ आमदारांचा पाठींबा असल्याचे भाजपचे चंद्रकांत पाटील आणि फडणवीस हे सांगतायत. जर असे असेल तर त्यांनी राज्यपालांना सरकार स्थापन करता येणार नाही, असे का सांगितले. फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही, असे मलीक म्हणाले.
तसेच फडणवीस यांची अवस्था पराभूत झालेल्या जनरलप्रमाणे झाली असून, ते आपल्या पराभूत सैन्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा पूर्णपणे पराभव झाला असून फडणवीस हे स्वीकारायला तयार नसून, मात्र त्यांना ते मान्य करावेच लागणार आहे. त्यांनी खूप मोठ-मोठी स्वप्न पहिले होते. त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती मान्य करायला थोडा वेळ लागेल, असेही मलीक म्हणाले.
तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.