मुंबई - आगामी काळात पक्षाकडून युवकांना अधिक संधी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट केले आहे. तसेच पवारांनी अनेक युवकांना आमदारही केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीप्रमाणेच विद्यार्थी आघाडीला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली असून दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, औरंगाबादचे ऋषिकेश देशमुख आणि पुण्याचे सनी मानकर यांची नावं चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुदत संपल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पदासाठी रोहीत आर.आर. पाटील यांचे नावही चर्चेत आहे. रोहित यांनी अध्यक्षपदी विराजमान व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीतून होत आहे.
मराठवाड्यातील ऋषिकेश देशमुख हे देखील विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत. विद्यार्थी चळवळीचा दांडगा अनुभव असलेले विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेश सदस्य आणि औरंगाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष देशमुख हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. आपण प्रदीर्घकाळ विद्यार्थी संघटनेत काम केलेले असून विद्यार्थी चळवळीचा मोठा अनुभव आहे. प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आक्रमकतेने वाचा फोडू, असं देशमुख यांनी सांगितले.
पुण्यातून सनी मानकर यांच्या नावाची देखील विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नांदेड, बीड, हिंगोलीमधूनही इच्छूकांची नावं समोर येत आहेत.