महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:34 PM2024-03-07T17:34:53+5:302024-03-07T17:35:41+5:30
अमित शाह यांच्याशी दोन दिवसआधीच शिंदे व अजितदादा गटासोबत केली चर्चा
Sunil Tatkare, Lok Sabha Elections 2024: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा तीव्र झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही जागावाटपाच्या मुद्द्यांवर खलबतं सुरू आहेत. भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली, त्यात महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नव्हता. त्यानंतर अमित शाह स्वत: मुंबईत चर्चेसाठी आले. अमित शाह यांनीअजित पवार, प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबद्दल आणि मतदारसंघाच्या चर्चांबद्दल महत्त्वाचे विधान केले.
मतदारसंघनिहाय जागावाटपाची चर्चा?
"मतदारसंघनिहाय जागा वाटपासंदर्भात पक्षनिहाय काहीच चर्चा झालेली नाही. या निव्वळ वावड्या आणि केवळ अफवा आहेत मात्र पुढील दोन दिवसांत मतदारसंघनिहाय एकंदरीत राजकीय चित्र नजरेसमोर ठेवून चर्चा होईल. अजून मागणी करण्याचा प्रश्नच आलेला नाही. बुधवारी प्राथमिक स्वरुपात चर्चा झाली. आम्हाला NDAमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही. येत्या दोन दिवसात नक्की होईल आणि अत्यंत समन्वयाने, सामंजस्याने जागा वाटप होईल व लगेचच दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल," असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार?
"जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तो झाल्याशिवाय यावर बोलता येणार नाही. दोन दिवसांत याबाबत निर्णय पूर्ण झाल्यावर, जर बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत", अशी माहिती सुनिल तटकरे यांनी पत्रकारांना दिली.
म्हणून २०१४ला पराभव झाला!
"अनंत गीते यांनी २०१४ साली सुनिल तटकरे नावाचे अनेक उमेदवार उभे केले नसते तर त्यांना मी त्याचवेळी पराभूत केले असते. देशात कमी मताने पराभूत त्यावेळी झालो मात्र २०१९ मध्ये देशात आणि महाराष्ट्रात जबरदस्त लाट असताना फक्त पाच जागा त्यापैकी चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरी जागा कॉंग्रेसला मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते यांचा ३३ हजाराने पराभव केला होता. त्यावेळेचे मित्रपक्ष आज नसतील परंतु आता वेगळे मित्रपक्ष सोबत आहेत. त्यामुळे विनाकारण पोकळ दावा करत स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न अनंत गीते करत आहेत. जनतेला मी गेल्या ४० वर्षांत केलेल्या कामाची पूर्ण माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा रहावे असे ठरवले आहे त्यामुळे अर्ज भरणार त्यावेळी आणि निकाल लागेल त्यावेळी किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होतो ते समजेल," असा इशारा सुनिल तटकरे यांनी दिला.