ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात ठाम भूमिका घेतली असून, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. यातच आता योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशमध्ये असणाऱ्या मशिदींवरील बेकायदा लाउडस्पीकर उतरवण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईबाबत राज ठाकरे यांनी योगी सरकारचे अभिनंदनही केले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली होती. याबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता, मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध घडामोडींबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले. खरे सांगायचे झाले, तर माझ्यासमोर सर्वांत मोठे आव्हान महागाईचे आहे. आता महागाईचे सर्वांत मोठे आव्हान समोर असताना मला काही सुचतच नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी त्यांना ट्विटरवर फॉलो करत नाही
अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, मी तुम्हाला खरे सांगू का, मी नाही त्यांना ट्विटरवर फॉलो करत. मी मगाशी सांगितले तसे मला इतकी कामे असतात की मला माझ्या जबाबदाऱ्यांमधून बाकी काही करायला फारसा वेळ मिळत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आली आहे.