Supriya Sule Replied Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीमधील मजकूर, शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना केलेली निवृत्तीची घोषणा, त्यानंतर मागे घेतलेला राजीनामा यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांनी पुस्तकात लिहिले आहे की, राज्यातील घडामोडींची बितंबातमी उद्धव ठाकरेंकडे नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचे कुठे काय घडते याकडे बारीक लक्ष नसे. उद्या काय घडेल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती जी नव्हती. काय पावले उचलावी लागतील, हे ठरवण्याचे राजकीय चातुर्य असायला हवे होते. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, असे शरद पवार पुस्तकात म्हणत आहेत. एक गोष्ट तर महाराष्ट्रात लक्षातच आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा त्याचेही आपल्याला प्रशिक्षण घ्यावे लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा परत घेईन. मग मीच माझ्या जागी परत येईन, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. याला आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या
पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचले तर १०० असे उल्लेख आहेत ज्यात उद्धव ठाकरेंचे कौतुक आहे. याला ‘सिलेक्टिव्ह अॅम्नेशिया’ असे म्हणतात. तो त्यांना सातत्याने होतो. पूर्ण अभ्यास करायचा नाही. कुणीतरी नोट्स काढून दिलेल्या असतात, तेवढ्या आपल्या वाचून दाखवायच्या. दरवेळी माणूस त्यावर पास होत नाही. पूर्ण पुस्तक वाचायचे असते, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी टीआरपीवरून केलेल्या विधानावर बोलताना, टीआरपी कसा वाढवायचा असेल तो शरद पवारांकडून शिका असे ते पूर्ण म्हणाले आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.