ठाणे: राज्यासह देशातही विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) परदेश दौऱ्यावर आहेत. यातच चीन सीमेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. काँग्रेससह अन्य विरोधक यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही पंतप्रधान मोदींना चीनच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे. ५६ इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरते मर्यादित असते. पण वास्तवापासून दूर असते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्यासह देशातील अनेक मुद्द्यांवर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत असून, जातीयवादाचे राजकारण केल्याचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरे दिली जात असताना सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. दगड आंब्याच्या झाडावर मारले जातात. बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारते का? त्यामुळे लोकं उठसुट शरद पवारांवर जातीचे आरोप करतात, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.
५६ इंच छाती वगैरे फक्त भाषणापुरते मर्यादित
चीनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तो गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले काही दिवस लोकसभेत युद्धावर बोलत होते. युद्ध हा तोडगा नाही असे आम्ही जे संसदेत विचार मांडले होते, तेच पंतप्रधानांनी मांडले आहेत. युद्धात कोणी जिकंत नाही फक्त महिला विधवा होतात. ५६ इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरतं मर्यादित असते. पण वास्वतापासून दूर असते, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. यावर, या देशात कोर्ट आहे. ज्यांना वाटते आहे की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी कोर्टात जावे, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला. तसेच नवाब मलिक यांची तब्येत लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत. त्यांना चांगल्या डॉक्टरांची गरज असून, आम्ही कोर्टात पाठपुरावा करत आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.