पालघर: कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राला इंधनावरील करावरून खडे बोल सुनावले. याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर पलटवार केला असून, मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात. पंतप्रधान मोदींच्या वागण्यावर नाराज नसून हैराण झाले आहे, अशी खोचक टीका केली आहे.
पालघर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक सामान्यांना अपेक्षित आहे. त्याऐवजी आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात. ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्यावर नाराज नसून हैराण आहे. आणि असे लोकसभेत व त्यांना वैयक्तिक भेटल्यानंतरही सांगितले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी मूळ विषयाला बगल दिली
कोरोनास्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा असताना त्यांनी मूळ विषयाला बगल दिली. कोरोना स्थितीसाठी राज्यांशी या विषयावर चर्चा करताना त्यांनी राज्य सरकारवर सर्व गोष्टी ढकलणे ही बाब दुर्दैवी होती, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. निवडणुकांमध्ये संघर्ष करा. पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून मोदींनी राज्यांची मदत करणे आवश्यक आहे, असे असताना महाराष्ट्रावर ते सातत्याने करत असलेली टीका ही दुःखद व वेदना देणारी आहे. कोविड पसरवला, महागाई या विषयावर बोलून महाराष्ट्रविषयी ते करत असलेली बदनामी अस्वस्थ करणारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वांत जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.