धुळे: आगामी मुंबईसह (BMC Election) राज्यातील अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार की नाही, याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नसला, तरी भाजपला दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र लढवण्यावर सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठे भाकित केले आहे. मुंबईत शिवसेनेची सत्ता येणार असून, महापौर शिवसेनेचाच होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लवकरच पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात प्रत्येक पक्षाकडून महापालिकेवर झेंडा रोवण्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार असून, शिवसेनेचा महापौर बसणार आहे. कोरोना काळामध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केले आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या धुळ्यात बोलत होत्या.
यंत्रणा ही पक्षाने चालवायची नसते
केंद्र सरकारकडून ईडी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. अनिल देशमुख यांच्यावर जवळपास १०९ वेळा ईडीतर्फे चौकशी करण्यात आली. तर मग आधी १०८ वेळा यंत्रणांनी तपासणी केली असता त्यांना काहीच मिळाले नाही का? असा प्रश्न विचारत केंद्र सरकारच्या ईडीच्या धोरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच यंत्रणा ही पक्षाने चालवायची नसते तर सरकारमध्ये जी सिस्टीम असते, त्या सिस्टीमने यंत्रणा चालवायची असते, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजना या दोन्ही योजना सक्षम फेल झाल्या आहेत. सध्या वाढत असलेल्या महागाईवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ तातडीची बैठक बोलवावी आणि सर्व राज्यांना या संदर्भामध्ये बैठकीत सामाविष्ट करून महागाई कमी करण्यासाठी काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा करावी, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.