Supriya Sule : शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:47 PM2023-07-05T15:47:52+5:302023-07-05T16:16:44+5:30
NCP Supriya Sule Slams Ajit Pawar : अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी अनेक गौप्यस्फोट करतानाच अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवृत्तीवरही स्पष्टपणे बोलले. कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय ५८ असतं. अधिकाऱ्यांसाठी ६० वर्षे असतं. भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. इथं ८२ झालं, ८३ झालं, तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला.
शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. "काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात. देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय ८६ आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय ८४, अमिताभ बच्चन 82, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
"श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी... हा बाप माझ्या एकटीचा नाही. तर माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कोणाबद्दलही बोला. महिला आहे... छोटसं बोललं तर चटकन डोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराबाई होते आणि तीच जिजाऊ होते. लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधातील आहे. NCP ला काय म्हणायचे... नॅचरली करप्ट पार्टी, असं म्हटलं होतं. देशात सर्वात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. सर्वांनीच हा आरोप केला आहे" असं म्हणत सुप्रिया यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसायचं तर आम्ही पोरी परवडल्या... लेक वडिलांसोबत उभी राहते. २०१९ मी विसरलेले नाहीत. आज 80 वर्षांचा योद्धा लढला. जे गेले त्यांना शुभेच्छा. गंमत अशी की त्या बॅनरवर पण शरद पवार आहेत. हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. भाजपाने द्वेष पसरवला, ताकदीने रस्त्यावर उतरा, भाजपाविरोधात बोलत राहू. सत्ता येते जाते. 8, 9 खुर्च्या मोकळ्या झाल्या, नवीन लोकांना संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा ओरिजनल राष्ट्रवादीचा झेंडा राष्ट्रवादीकडेच राहील, राष्ट्रवादीकडे एकच शिक्का आहे त्याचं नाव शरद पवार" असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.