राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाच्या दर्शनामुळे मनाला सुख आणि आनंद मिळतो असं सांगितलं. तसेच दोन वर्ष कोरोना काळात कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते असंही म्हटलं आहे. याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी "दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्ष अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते" असं म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंनी याआधी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. '५० खोके ऑल ओके'वाल्या या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. सध्यातील सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना...हे एवढे सेलिब्रेशन करण्यात येवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला... त्यानंतर लग्न केलं... मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरू आहे, असा टोला लगावला होता. तसेच ५० खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं.
मूळ मुद्द्याला बगल देण्याची भाजपची जुनी खेळी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार पाडण्यासाठी इतर राज्याची मदत घ्यावी लागली ही शोकांतिका म्हणावी लागेल . सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली होती.