राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी Whatsapp वर पाठवला आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
ओरबाडून, दडपशाही करून चुकीच्या पद्धतीने सरकार सत्तेत आलं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही असंही म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी "महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत... हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही" असंही म्हटलं आहे.
"शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार"
सुप्रिया सुळे यांनी याआधी देखील राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला होता. दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्ष अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते असं म्हटलं होतं.
"५० खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके"
'५० खोके ऑल ओके'वाल्या या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. सध्यातील सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना...हे एवढे सेलिब्रेशन करण्यात येवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला... त्यानंतर लग्न केलं... मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरू आहे, असा टोला लगावला होता. तसेच ५० खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं.