पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत पांगारकर याने प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
"गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे" असंही म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"अतिशय धक्कादायक! गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण...! प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळेची एसआयटीने चौकशी केली. त्यात महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगितल्याचे त्याने सांगितले. तपासातून समोर आले की, गौरी लंकेश यांची हत्या होण्यापूर्वी आणि नंतर श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता. या प्रकरणात पांगारकरला अटक करण्यात आली.