आज नव्या संसद भवनाचा उद्धाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या वास्तुचे उद्धाटन झाले. या सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनीही पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडाला साष्टांग नमस्कार केला. यासोबतच त्यांनी उपस्थित साधूसंताचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. माध्यमाशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. "ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो. नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही."
"चर्चा पूर्णपणे त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांना सोयीप्रमाणे लागतो आणि सोयीप्रमाणे तो त्यांच्या कामाचा नसतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका, सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "या देशाच्या संसदेचे मालक होण्याचा प्रयत्न कोणी करू नये यासाठीचा हा युद्धप्रसंग आहे" असं म्हटलं आहे. सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका; सर्व काही मी म्हणजे मोदी, हा अहंकारच"
"लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. संसदेच्या उद्घाटनास देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, विरोधी पक्षनेत्यांना मान नाही. सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन न करणे आणि त्या सोहळ्याला त्यांना न बोलावणे हा देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा अपमान आहे. ज्या देशाची अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ट्रेनच्या फरशीवर आणि टॉयलेटच्या बाहेर उभे राहून प्रवास करते, त्या देशात कारण नसताना संसदेच्या इमारतीवर 20 हजार कोटींचा खर्च झाला व त्या संसदेच्या उद्घाटन सोहळय़ात देशाच्या राष्ट्रपतींनाच डावलले याचीही नोंद इतिहासात राहील" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.