Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही ना काही कारणांवरून विरोधक सातत्याने टीका करत असून, एकामागून एक वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपावरून विरोधकांनी निशाणा साधायला सुरुवात केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. घरात बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला असली तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टप्पणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत
अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत, असा मिश्किल टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. टीव्ही९ ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्यानंतर मंत्रिपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदीपान भुमरे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे, असे म्हटले जात आहे. नाराजीच्या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.