माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्वमधील खेरवाडीत सिद्दिकी यांचा मुलगा आ. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते. त्याच वेळी बाबा सिद्दिकींवर तीन जणांनी गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे.
"पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी" असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अतिशय धक्कादायक! मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले."
"पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी" असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दोन बंदुकींमधून सिद्दिकी यांच्यावर सव्वानऊच्या सुमारास चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या सहकाऱ्याच्या पायावर गोळी लागली आहे. घटनेनंतर झिशान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तातडीने रुग्णालयात पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनेची माहिती घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.