राष्ट्रवादीचा २४ जागांचा आग्रह, काँग्रेसचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:56 AM2018-11-03T03:56:23+5:302018-11-03T14:44:25+5:30
३८ ते ४० जागांवर एकमत झाल्याचा दोन्ही प्रदेशाध्यक्षांचा दावा
मुंबई : सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला ४८ पैकी २४ जागा द्या, असा आग्रह शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाने धरला, मात्र काँग्रेस २४ जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. ५ राज्यांच्या विधानसभांचे निकाल ११ डिसेंबरला आहेत. त्यानंतर वाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
आमचे ३८ ते ४० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवला जाईल असे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उर्वरित आठ जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. १९ नोव्हेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे, त्याकाळात बैठक होईल व अंतीम शिक्कामोर्तब केले जाईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील यांनी देखील हेच सांगितले. ते म्हणाले, मित्रपक्षापैकी खा. राजू शेट्टी, समाजवादी पक्ष, सीपीएम आणि सीपीआय यांच्याशी १९ नोव्हेंबरनंतर बोलणी होईल. त्यांच्यासाठी कोणत्या व कोणी जागा सोडायच्या यावर निर्णय होईल.
दिंडोरीची जागा राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी लढवली होती. त्या पराभूत झाल्या होत्या. ही जागा आता सीपीयआयने मागितली आहे. तर पालघरची जागा हितेंद्र ठाकूरसाठी काँग्रेसने सोडावी आणि ठाकूर यांनाही आघाडीत घ्यावे असाही आजच्या बैठकीत सूर होता. त्याशिवाय काँग्रेसने अमरावती, अहमदनगर या २ जागा मागितल्या, ज्या राष्ट्रवादीकडे आहेत.
राजू शेट्टी यांना हव्यात चार जागा
राष्ट्रवादीने २०१४ साली २१ जागा लढवल्या होत्या. या वेळी त्यांनी औरंगाबाद, पुणे, जालना, यवतमाळ व हातकणंगले यापैकी कोणत्याही ३ जागा द्या अशी मागणी केली आहे. हातकणंगलेमधून खा. राजू शेट्टी निवडून आले आहेत. त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर निर्णय झालेला नाही. शिवाय शेट्टी यांनी बुलडाणा, वर्धा, सांगली आणि हातकणंगले हे मतदार संघ मागितले आहेत.