लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी हा अतिशय प्रोफेशनल पक्ष आहे. त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमजोर केले, नंतर तो पक्ष फुटण्यास बाध्य केले आणि आता ती रिक्त जागा प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हिंदुत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी सातत्याने काम करीत असल्याने ती रिक्त जागा राष्ट्रवादी भरून काढेल, असे मला वाटत नाही, असेही फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विजय देशमुख यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात पीएफआयच्या बंदीचा उल्लेख आहे. इतरही नेत्यांचीसुद्धा नावे आहेत. त्यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. राज्य सरकार संपूर्ण मदत करते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतसुद्धा जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी होत आहे. असे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध कुभांड रचलेरश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. तत्कालीन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना हाताशी धरून कुभांड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत. पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर अन्याय करणार नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही.