कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे गावच्या किशोरवयीन तरुणास राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री चोप देत कोल्हापूरी खाक्या दाखविला.ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, या सुप्रिया सुळे यांच्या विधानाविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक अकाउंटवर होती. या बातमीच्या कॉमेंट बॉक्समध्ये या तरुणाने सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द वापरले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलने या तरुणाचा शोध घेतला असता तो कोल्हापूर जिल्ह्यातील चावरे येथील असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती मिळताच संतप्त कोल्हापूरातील राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाशी संपर्क साधला, त्याला बोलावणे पाठविले, पण तो आला नाही.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी चावरे गावी जाउन त्याचा शोध घेत त्याला चोप दिला आणि जाहीर माफी मागायला भाग पाडले, शिवाय या तरुणाचे हे कृत्य त्याच्या आईवडिलांच्या निदर्शनास आणून दिले. कार्यकर्त्यांनी या तरुणाला त्याच्या आईवडिलांच्या पाया पडायला सांगितले.राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसचे कल्पेश चौगुले, नामदेव पाटील, अर्जुन जाधव, रविराज सोनुले, संतोष वडेर, अजित मोरे आदींनी चावरे गावी जाउन या तरुणाकडून लेखी माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकला.
कोणत्याही क्षेत्रातील महिला असो, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान राखणे ही आपली संस्कृती आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या वृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस माफ करणार नाही. चावरे येथील संबंधित तरुणाने केलेला प्रकार निंदनीय आहे. त्याला समज देउन पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते चावरे येथे गेले होते. मात्र त्याने समोर येणे टाळले. कुटूंबियांच्या आग्रहास्तव समोर आला, पण माफी मागण्यास तयार होत नव्हता, म्हणून संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी आईवडीलांसमोरच कोल्हापूरी खाक्या दाखवित माफीनामा लिहून घेतला. त्याच्या करियरचा विचार करुन तक्रार न देता समज दिली आहे.रोहित पाटील,अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोल्हापूर