"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..."
By अजित मांडके | Published: February 7, 2024 09:48 PM2024-02-07T21:48:16+5:302024-02-07T21:48:54+5:30
शरद पवारांना राजकीयदृष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला.
ठाणे : त्यांनी घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लागवला. त्याबळावर आम्ही पुन्हा जोमाने भरारी घेऊ, असेही ते पुढे म्हणाले. बुधवारी रात्री आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांचा फोटो असलेले नवीन पक्षाचे पोस्टर ही जारी केले.
निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' असे नाव जाहीर केले आहे. मुळात हा पक्षच शरद पवार यांचा आहे. हे आता नियतीने ही दाखवून दिले. आमच्याकडून त्यांनी घड्याळ चोरले, पण मनगट आमच्याकडे राहिले, त्यांच्यात दम असेल तर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार असे नाव लावावे, असे आव्हान ही त्यांनी यावेळी दिले.
अखेर सत्य सामोरे आलेच ! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत- न कळत हे दाखवून दिले की, एनसीपी ही शरद पवार साहेबांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार" . हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 7, 2024
निवडणूक आयोगाचा निर्णय हा दुट्टपी आणि संभ्रम निर्माण करणारा आहे. निवडणूक आयोग खोटे बोलत आहे. ते विरोधाभास दर्शवत आहे. निवडणुक आयोग नाही तर कटपुत्तली आहे. शरद पवार यांना राजकीयदुष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तुम्ही पाकीटमारासारखे घड्याळ चोरले आहे. पण मनगट तोडायला विसरले. ते मनगट शरद पवार यांचे आहे. ते नव्या जोमाने उभे राहतील. यांनी सावली देणाऱ्या वटवृक्षावर यांनी घाव घातला. यात सगळ्यांचा हातभार लागला आहे.
ते शरद पवार यांचा राजकीयदृष्टया गळा घोटायला निघाले. पण नियती त्यांना येत्या काळात दाखवून देईल, शरद पवार काय आहेत. ८४ व्या वर्षी शरद पवारांना जे छळतात त्यांचा बदला जनता घेईल. हम लडेंगे और जितेंगे भी! असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पोस्टर प्रसार माध्यमासमोर जाहीर केले.