मुंबई - मला राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी अन्य कुणाला संधी मिळेल. त्यामुळे फार अफवा पसरवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायेत त्या आम्हाला वाटत नाही. अनेक गोष्टी भविष्यात समोर येतील असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. परंतु याआधीच ते राज्यसभेचे उमेदवार आहेत. मे २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ बाकी असताना तांत्रिक कारण पुढे करून पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. आज प्रफुल पटेल यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी पटेल यांनी संवाद साधताना म्हटलं की, आमच्या बाजूने निकाल लागेल अशी प्रार्थना करतो. विधानसभा अध्यक्ष निकाल सुनावणार आहे. त्यांच्या निकालाची वाट पाहू पण आमच्या बाजूने निकाल यावा अशी आम्ही प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येकाच्या टीकेला उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्यांना जे वाटते ते करतात. आम्हाला जे काही करायचे हे आमच्या पद्धतीने करतो. आम्ही जे केलंय ते योग्य आहे त्यावर संशय घेण्याचे कारण नाही. बहुतेक ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता आहे. जरी निवडणूक झाली तरी प्रत्येक पक्षाकडे त्यांच्या मतांचा कोटा आहे असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रफुल पटेल यांच्या जागी पोटनिवडणूक लागेल. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची संमती घेतली आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करुन आमच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे, असंही तटकरे म्हणाले. पक्षासमोर दहा जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. याबाबत पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बाजूचा विचार करुन पक्षाने हा निर्णय घेतला आहे असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.