सिंधुदुर्गनगरी : ‘अच्छे दिन’ येणार असे म्हणणारे सरकार एक वर्ष झाले तरी अद्याप जनतेचे प्रश्न सोडवू शकलेले नाही. शेतकऱ्यांच्या भाताची अद्याप खरेदी झालेली नाही. आंबा व काजू बागायतदारांना न्याय मिळाला नाही. यासाठी राज्यभरात राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे दिला.येथील शरद कृषी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, अमित सामंत, अबिद नाईक, सुरेश दळवी, प्रवीण भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, खरीप हंगामाचे भात अद्याप खरेदी झालेले नाही.जनतेच्या डोळ्यात हे सरकार धूळफेक करीत आहेत. कोकण विकासाच्यादृष्टीने या सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करेल व त्यांना मदत करण्यास भाग पाडेल. येथील आंबा व काजू बागायतदारांचे प्रश्न सोडविले गेलेले नाहीत. त्यांना ठोस मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहील. ‘ते’ प्रकरण गंभीर आहेराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा तटकरे यांनी निषेध केला. बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा असलेल्या सिंधुदुर्गात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या हल्ल्याची चौकशी मुख्यमंत्र्यांमार्फत झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)शिवसेना दुटप्पी भूमिकेतशिवसेना व भाजप एकत्रित सत्तेत आहेत. मात्र, जैतापूरच्या बाबतीत शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. केंद्र सरकारने अणुऊर्जा प्रकल्पाबाबत योग्यरीत्या मतही मांडलेले नाही. पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला भूमिकाही मांडता आली नाही. जैतापूरसंदर्भात त्यांच्यासमोर बोलण्याची हिंमतही ते करू शकले नाहीत. सत्तेत असलेली शिवसेना अशाप्रकारे दुटप्पी भूमिका करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.
राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन छेडणार
By admin | Published: May 19, 2015 11:48 PM