NCP vs BJP: गेल्या काही दिवसांपासून २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपासोबत सत्तास्थापना केली. पहाटेच्या वेळी हा शपथविधी पार पडला आणि त्याची चांगलीच चर्चा रंगली. असे असले तरी हे सरकार दीड दिवसांतच पडले. यावरून बोलताना, काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले की शरद पवार यांना या शपथविधीची कल्पना होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा दावा केला आहे की, शरद पवारांना भाजपासोबत युती मान्य होती, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते. यावर राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.
"चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना भाजपसोबत युती मान्य होती परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते असे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशीर्वाद होता असे वक्तव्य केले आणि म्हणून ते मुख्यमंत्री पुन्हा झाले आहेत. बावनकुळे आणि फडणवीस या दोघांची वक्तव्ये परस्परविरोधी आहे. या दोघांमध्ये कोण खरं बोलतंय हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतच राष्ट्रवादी आहे. महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादीने जवळ केलेले नाही आणि करणारही नाही," असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले.
"शरद पवार यांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. त्यांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालतील पण फडणवीस नको आहेत. हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळेच पवार हे फडणवीस यांना विरोध करायचे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात," असा दावा बावनकुळेंनी केला.