अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारांनी मी उद्यापासून महाराष्ट्रभर फिरण्यासाठी बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. आज पवार यांनी कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर भेट दिली. यावेळी त्यांनी भाजपा आणि अजित पवार यांना इशारा दिला आहे.
राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. एकोप्याने राहणाऱ्या समाजात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगे घडविण्यात आले. हे न शोभणारे आहे. लोकशाहीचा अधिकार जतन करण्याची गरज आहे. त्याच्याविरोधात काही शक्ती काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज , शाहू, फुले , आंबेडकर यांच्या महाराष्ट्रा त चुकीचा प्रवृत्ती डोके वर काढत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखविणार. येत्या काळात जनता त्यांना उत्तर देईल, असा इशारा पवार यांनी दिला.