मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवकच्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली. तर 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता.
वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगारांना कामावरून काढण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मंगळवारी रस्तावर उतरले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आंदोलन करत सरकराचा निषेध केला.
शिक्षक व पोलिस भरती झालीच पाहिजे. रिक्त असलेल्या जागा शासनाने भरल्याच पाहिजे, 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडले होते. आज १५ आंदोलन करून सुद्धा या सरकाराला जाग येत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही, आहेत त्यांना कामावरून काढले जात आहे. मात्र असे असताना ही, हे सरकार काहीच करत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी यावेळी केला.