अजितदादांकडून आरोपांची मालिका; पवारांच्या युवा शिलेदाराने जुना VIDEO काढत कोंडीत पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:50 PM2023-12-01T20:50:12+5:302023-12-01T20:53:03+5:30
अजित पवारांच्या चौफेर टीकेनंतर आता शरद पवार गटातील नेतेही आक्रमक झाले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत राज्य सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या गटाच्या राज्यव्यापी शिबिरात तुफान फटकेबाजी केली. अजित पवार यांनी भाषणातून शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले. पवार यांची भूमिका धरसोडपणाची आणि आम्हाला गाफील ठेवणारी होती, असा हल्लाबोल त्यांनी केला. अजित पवारांच्या टीकेनंतर आता शरद पवार गटातील नेतेही आक्रमक झाले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी जुना व्हिडिओ शेअर करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर तेव्हा महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अजित पवारांनी विविध सभांमधून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबतचा व्हिडिओ शेअर करत महेबूब शेख यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "जे शब्दाचे पक्का म्हणवून घेतात, त्या नेत्यांनी त्यांचा स्वतःचा हा व्हिडिओ एकदा डोळे भरून पहावा आणि दोन दिवसापासूंन सुरू असलेल्या खोटं बोल मंथन रडारड शिबिरामध्ये देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना दाखवायला हवा होता,' असा टोला शेख यांनी लगावला आहे.
जुन्या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी काय म्हटलं होतं?
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेवर दावा सांगण्यात आल्याच्या कृतीवर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुमच्यात धमक होती तर काढा ना स्वत:चा पक्ष, कोणी अडवलं होतं? ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, पक्ष वाढवला, शिवाजी पार्कवर काढलेला तो पक्ष महाराष्ट्रभर पसरवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी हे जनतेला पटलं आहे का? याचाही विचार झाला पाहिजे," असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
जे शब्दाचे पक्का म्हणून घेतात त्या नेत्यांनी त्यांचा स्वतःचा हा व्हीडीओ एकदा डोळे भरून पहावा आणि दोन दिवसापासुन सुरु असलेल्या खोट बोल मंथन रडारड शिबीरामध्ये देखील सगळ्या पदाधिकऱ्यांना दाखवायला हवा होता..! pic.twitter.com/MGzYsNCzlo
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) December 1, 2023
शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले अजित पवार?
"शरद पवार यांनी आधी स्वत:च सांगितलं की मी राजीनामा देतो आणि नंतर राजीनामा मागे घेण्यासाठी लोकांना आंदोलने करायला सांगितली. हे नेमकं कशासाठी? भूमिकेबाबत सतत धरसोड करण्यात आली आणि आम्हाला गाफील ठेवण्यात आलं. शपथविधीनंतरही सर्व आमदार आणि मंत्र्यांना भेटायला बोलावलं. सांगण्यात आलं की गाडी ट्रॅकवर आहे. मात्र नंतरही निर्णय घेण्यात आला नाही. मग आमचा वेळ का घालवला?" असा सवाल करत अजित पवार यांनी आज शरद पवारांना लक्ष्य केलं.