पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:51 PM2024-01-19T17:51:04+5:302024-01-19T17:52:15+5:30
देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत असं उमेश पाटील यांनी म्हटलं.
मुंबई - सुप्रिया सुळेंना सुरुवातीला राज्यसभेची संधी कार्यकर्त्यांमुळे निवडून आलेल्या आमदारांमधून दिली गेली. त्यानंतर महाराष्ट्राला सुप्रिया सुळेंचं कर्तृत्व आणि पात्रता कळाली. जर त्यांच्यात एवढी पात्रता असती तर आज जे ५३ पैकी ४३ आमदार अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले तेच आज सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे राहिले असते अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटावर बोचरी टीका केली.
शरद पवारांनी एका सभेत बोलताना पात्रता असूनही सुप्रिया सुळेंवर अन्याय केला आणि कार्यकर्त्यांना संधी दिली असं विधान केले. त्यावर उमेश पाटील यांनी ही टीका केली आहे. उमेश पाटील पुढे म्हणाले की, वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सिंह हा कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. तो कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेला. त्यामुळे हा गृहदोष निर्माण झाला. शरद पवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आमची अक्कल पात्रता अजिबात नाही. पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनातलं बोलतो. सुप्रिया सुळेंमध्ये कर्तृत्व नक्कीच आहे. त्या संसदपटू, संसदरत्न आहेत. हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. मग दिल्लीत पक्षाचा एखादा नगरसेवक किंवा आमदार का निवडून आला नाही असा सवाल त्यांनी विचारला.
त्याचसोबत देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत. आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर अनेक राज्यात का पसरला नाही. सुप्रिया सुळेंमध्ये हिंदी, इंग्रजीचं प्रभुत्व होते मग त्यांनी देशभरात इतर राज्यात फिरून पक्ष का वाढवला नाही. जर तसा पक्ष वाढवला असता. १००-२०० आमदार, खासदार त्यांच्या माध्यमातून निवडून आले असते तर निश्चितपणे त्यांच्यामधील गुणवत्ता, पात्रता प्रमाणित झाली असती. आज ५३ पैकी ९०-९५ टक्के आमदार अजित पवारांच्या पाठिशी आहेत. लोकशाहीत ज्याच्यामागे आमदार, खासदार असतात तोच नेता असतो. त्यामुळे ही वस्तूस्थिती लक्षात घ्यावी. कुणाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही असंही उमेश पाटील यांनी सांगितले.