मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा पाचवा टप्पा ६ मेपासून कोकणातून सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे आंदोलन टप्प्याटप्प्यात करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.या हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात पालघर जिल्ह्यातून होणार असून ६ व ७ मे रोजी पालघर आणि ११ ते १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात होणार आहे. तर १ ते ५ जून रोजी सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन होणार आहे.खोटारड्या आणि नाकर्त्या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे हल्लाबोल आंदोलन केले. कोल्हापूरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ३८ ठिकाणी सभा झाल्या. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसा प्रतिसाद चौथ्या टप्प्याच्याही आंदोलनाला मिळाला. तरुणवर्ग, महिला, राष्ट्रवादीसोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. राष्ट्रवादीच्या आंदोलनातून लोकांनी सरकारविरोधातील आपला संताप व्यक्त केल्याचे दिसून आले, असेही तटकरे या वेळी म्हणाले.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनातून ८८ सभा झाल्या. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन म्हणतात की, हल्लाबोल आंदोलनाबाबत आम्हाला माहिती नाही. त्याबाबत एकही निवेदन मिळाले नाही. आम्ही सर्वप्रांत, तहसीलदारांना निवेदन दिले आहे. हल्लाबोल आंदोलनातून दिलेली निवेदने मंत्रालयात पोचली नाहीत, असे गिरीश महाजन म्हणत असतील, तर मंत्रालय आणि स्थानिक पातळीवर संवाद नाही हे यातून दिसून येते, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.नाणार प्रकल्पाबाबत कोकणवासीयांची मोठी फसवणूक सरकारने केली आहे. आम्ही सरकारमध्ये असताना कोकणात रासायनिक प्रक्रिया करणारे प्रकल्प नकोत, अशी भूमिका घेतली होती. पर्यावरण उद्ध्वस्त करणाºया या प्रकल्पाला आम्ही आधीपासूनच विरोध करत आहोत. १० मे रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादीचा ६ मेपासून कोकणात हल्लाबोल, सुनील तटकरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:44 AM