राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा, काँग्रेसमध्ये सामसूम
By अतुल कुलकर्णी | Published: January 18, 2018 04:31 AM2018-01-18T04:31:56+5:302018-01-18T04:33:34+5:30
राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे
मुंबई : राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे. ज्येष्ठ नेत्यांमधे एकवाक्यता होत नाही. राज्याचे नेतृत्व कोणी करायचे याविषयी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चुरस लागल्याने पक्षातल्या अन्य नेत्यांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.
राष्ट्रवादीने मात्र सगळ्या पातळ्यांवर सरकारच्या विरोधाची धार वाढवणे सुरू केले आहे. एकीकडे अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि त्यांच्या बरोबरीने खा. सुप्रिया सुळे हे ज्येष्ठ नेते राज्यभर फिरत आहेत. विदर्भात त्यांनी काढलेली हल्लाबोल यात्रा यशस्वी झाली. त्याचा शेवट पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केला गेला. मराठवाड्यात सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत संविधान बचाव आंदोलनात राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. यासाठी शरद पवार यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली असून फारुक अब्दुल्ला, शरद यादव, सीताराम येचुरी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांना त्यांनी आमंत्रित केले आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे नेते सहभागी व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते बोलत असताना काँग्रेसने स्वतंत्र प्रेसनोट काढून काँग्रेसचे सगळे नेते यात सहभागी होतील असे दोन दिवसांनी जाहीर केले. आमच्या वरिष्ठ नेत्यांचे आपापसांतील वादच संपत नाहीत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, संघटनेच्या कामात मी कसा हस्तक्षेप करणार? अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना विखेंचे विधिमंडळातील काम पटत नाही. विदर्भातील नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ काँग्रेसचे पिल्लू सोडून दिले आहे. पक्षातर्फे मोठे राज्यव्यापी आंदोलन कोणी घेत नाही, अशा स्थितीत आम्ही करायचे तरी काय, असा सवाल काँग्रेसचे अनेक आमदार करत आहेत.
भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत झाली. त्यात आता लोकसभेसाठी सज्ज व्हा असे सांगण्यात आले. तेव्हा आम्हाला कोणतेही पद दिले नाही, मान दिला नाही; आणि आता निवडणुका जवळ आल्या की आम्हालाच कामाला लागा म्हणता, आम्ही कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे, असे प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी विचारल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.