ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 09 - ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापुरात सोमवारी नोटा बंदीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील एटीएम मशीनमध्ये म्हशी बांधण्यासाठी गेले पण, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सदस्य आर. के.पोवार व शहराध्यक्ष राजेश लाटकर व महापौर हसिना फरास यांच्या नेतृत्वाखाली नोटा बंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. सकाळी सर्वजण महाराणा प्रताप चौकात जमले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. चार म्हशी घेऊन पदाधिकाºयांसह कार्यकर्ते लक्ष्मी रोडमार्गे लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेजवळ आले. त्यावेळी पायरीवरून एटीएममध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी म्हशी नेल्या. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’असे फलक म्हशीवर लावण्यात आले होते. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला.
या आंदोलनात कार्याध्यक्ष अनिल कदम, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रा.जयंत पाटील, माजी स्थायी सभापती आदिल फरास, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमोल माने, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अफझल पिरजादे, नगरसेविका सरिता मोरे, माजी स्थायी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक विनायक फाळके, निरंजन कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शीतल तिवडे, सुनील देसाई आदींचा सहभाग होता.