पिंपरी : विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करता यावे, या उद्देशाने निवडणूक जवळ आली, आचारसंहितेला थोडा अवधी उरला की, विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा धडाका लावायचा. एकदा नव्हे, तर पुन: पुन्हा एकाच प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ करायचे, अशी प्रथा सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने रुजवली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच दिवसांचा अवधी उरला हे लक्षात येताच, दोन महिन्यांत आखण्यात आलेला भूमिपूजन कार्यक्रमांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा आहे. रविवारी, ३१ आॅगस्टला त्यांचा शहर दौरा आहे. पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानासमोर चौक सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन वगळता उर्वरित सर्व कार्यक्रम भूमिपूजनाचे आहेत. दिघी येथे माजी सैनिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचे दुपारी दोनला भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वादोनला चऱ्होली-दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे, दुपारी पावणेतीनला इंद्रायणीनगर येथे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे, ४ वा. चिंचवड-दळवीनगर येथे वॉर्ड सेंटरचे, ५ वा. ताथवडे गावठाण चौकात पाणीपुरवठा विषयक कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. सायंकाळी ५.३० ला पिंपळे निलख येथील वाय जंक्शनजवळ २४ मीटर रस्त्याचे भूमिपूजन आणि शेवटी पिंपळे निलख येथील साई चौकात बीआरटीएस रस्त्याच्या उर्वरित कामाचे भूमिपूजन होईल.(प्रतिनिधी)
श्रेयासाठी राष्ट्रवादीची भूमिपूजन मॅरेथॉन
By admin | Published: August 30, 2014 1:37 AM