पुणे : ब्राहमण समाजाविषयी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेले वक्तव्य वादात सापडले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यावर जहरी टीका केली आहे. लोकप्रतिनिधीने कोणत्याही एका विशिष्ट्य समाजाला पुरस्कृत करणे चुकीचे असून शाहू- फुले- आंबेडकर झिजले नसते तर आज आमदार कुलकर्णी घर भाकऱ्या थापत बसल्या असत्या अशा शब्दात वाघ यांनी कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर हल्ला चढवला आहे.
पुण्यात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात कुलकर्णी यांनी समाजात असमानता निर्माण करण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र ही असमानता निर्माण करणा-या ’’बारामतीकरांच्या’’ लक्षात येत नाही की, यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल, असे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाज पूर्वीपासून दुसऱ्यांसाठी झटत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉलेने भारतीय समाजात ज्या पद्धतीने फूट पाडली, तसा प्रयत्न बारामतीकर करत आहेत अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला वाघ यांनी प्रत्युत्तर दिले असून आहे.
त्या म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांच्या आमदार,खासदारांच्या डोक्यात हवा गेली आहे. बेताल वक्तव्य करण्यात यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. साहेब नसते, शाहू-फुले-आंबेडकर नसते तर आमदार कुलकर्णी पण आमदार झाल्या नसत्या कुठेतरी भाकऱ्या भाजत बसल्या असत्या, हे त्यांनी विसरायला नको.लोकप्रतिनिधी म्हणून पवारांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी लोकांची कामे करावीत. आजपर्यंत मी त्यांचे एकही उल्लेखनीय काम बघितले नाही. त्या कोणत्याही पक्षातून असल्या तरी महिलांचे प्रतिनिधित्व करत आहेत. महिलांना अभिमान वाटेल असे काम करण्याऐवजी त्या फालतू गोष्टीत रस घेताना दिसत आहेत हेच दुर्दैव आहे.